डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी ५० सुविचार

1) जर भारताला २०२० मध्ये पूर्ण विकसित व्हायचं असेल तर भारताला तरुणांच्या खांदयावर आरूढ व्हावचं लागेल.
2) राष्ट्र हे कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा व संस्थेपेक्षा मोठ आहे हा विचार सर्वांनीच करणं आणि त्याची जाणीव बाळगणं आवश्यक आहे.
3) आपला घाम विकसनशील भारताला विकसित भारतात बदलवून टाकील.
4) बदल हा दुरदृष्टी, नवप्रवर्तक मन आणि मार्गदर्शक उत्साह यांच्या परिणामातून होत असतो.
5) एखाद्या चांगल्या ग्रंथाच्या संपर्कात येणं आणि तो ग्रंथ हस्तगत करणं हे आयुष्यातलं नश्वर ऐश्वर्य असतं.
6) दररोज एक तास फक्त वाचनासाठी दया. काही वर्षांनी तुम्ही ज्ञानाचं केंद्र झालेलं असालं.
7) शिक्षक हे ज्ञानदानचं करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी त्यांच्यात महान स्वप्न आणि ध्येय जागवत असतो.
8) शिक्षकाची भूमिका म्हणीतल्या शिडीसारखी असते. प्रत्येक जण आयुष्यात वर चढून जाण्यासाठी शिडीचा उपयोग करतो; पण शिडी मात्र आपल्या जागीच स्थिर असते.
9) सम्राटापासून तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत सदाचारयुक्त आयुष्याचं संवर्धन हाच सर्वांचा पाया आहे.
10) आपण सर्वांनी पृथ्वीवरील उत्कृष्ट स्थानांपैकी एक असं वसतीस्थान असेल असं राष्ट्र निर्माण केलं पाहिजे, आणि करोडोंच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं पाहिजे.
11) किशोर समुदायाचं ध्येय भव्य असलं पाहिजे. क्षुद्र ध्येय हा गुन्हा आहे.
12) विज्ञान म्हणजे प्रश्न विचारणं आणि कठोर परिश्रमानं व निसर्ग नियमांच्या संशोधनानं सुयोग्य उत्तरं शोधणं.
13) जेव्हा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला जाईल आणि त्याचं आयुष्य परिपूर्ण व प्रतिष्ठित होईल, तेव्हाच राष्ट्रीय शांतता व संपन्नता शक्य होईल.
14) जोपर्यंत समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत प्रश्न विचारात राहा.
15) विचारवंतच देशाचे सर्वोच्च वैभव असते.
16) प्रतिकूल स्थितीत तग धरून राहण्यासाठी आणि आयुष्यात सफल होण्यासाठी मानवजातीला मदत करणं हा लेखकांचा विशेषाधिकार आहे.
17) शिकवण्यासाठी विचारांचं आणि कल्पनाशिलतेचं स्वातंत्र्य आवश्यक असतं. या दोन्ही गोष्टी सुसाध्य करून देणं शिक्षकाचं काम आहे.
18) ज्ञान, उत्साह आणि तरुणांचे कठोर परिश्रम यांचा संयोग म्हणजे महान गतिशील अग्नी. तोच देशात परिवर्तन घडवून आणू शकतो.
19) राष्ट्राची थोरवी लोकांच्या विचार पद्धतीत असते.
20) ‘स्वप्न-विचार-कार्य’ हे तत्वज्ञान मला सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजवायचं आहे.
21) चांगलं पुस्तक हे अनेक पिढ्यांसाठी महान ज्ञानाचं आणि संपत्तीच उगमस्थान असतं.
22) सतत स्वप्ने बघत राहा. तुमच्या स्वप्नाचं विचारात रुपांतर होईल. विचारांमुळे तुम्ही प्रामाणिक कामाकडे वळाल. कामाचा शेवट क्रियाशील होण्यात होईल आणि तुम्हाला सफलता मिळेल.
23) राष्ट्रात सृजनशील नेत्यांचं जेवढ जास्त प्रमाण असेल, तेवढी जास्त ‘विकसीत भारता’ च्या यशाच्या द्रष्टेपणाची क्षमता असेल.
24) क्रियाशील असण्याची बांधिलकी असेल, तरच यश शक्य होईल.
25) संबद्धता म्हणजे शक्ती, संबद्धता म्हणजे संपत्ती, संबद्धता म्हणजे प्रगती
26) महान मन आणि विशाल हृदय कायम एकत्रच असतात.
27) राष्ट्राच्या इतिहासातलं एक पान निर्माण करण्यावरुनच तुम्ही कायमचे ओळखले जाल.
28) प्रबुद्ध नागरिकतेचे तीन घटक असतात: मुल्याधीष्ठीत शिक्षण, आध्यात्मिक सामर्थ्यात बदलणारा धर्म आणि विकासाद्वारे निर्माण होणारी आर्थिक समृद्धी.
29) विचार करणं आणि प्रश्न विचारणं थांबवता येत नाही. उत्तरं शोधण्यासाठी सक्रीय होण्याची नितांत गरज असते आणि त्यासाठी कष्टाची व चिकाटीची गरज असते.
30) शिक्षण हा ज्ञानातून आणि प्रबोधनातून होणारा अंतहीन प्रवास आहे.
31) आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचं स्मित कायम टिकून राहील, अशी एखादी शिक्षण प्रणाली आपल्याला शोधता येईल का?
32) शिकण्यातून सृजनशीलता येते. सृजनशीलतेतून विचार जन्मतात. विचारांतून ज्ञान जन्मतं. ज्ञानामुळेच तुम्ही थोर होऊ शकता.
33) प्रत्येक मन सृजनशील असतं, प्रत्येक मन जिज्ञासू असतं.
34) जनतेचं कौशल्य, प्राविण्य, आणि कल्पनाशक्ती हीच देशाची अमुल्य मालमत्ता असते.
35) विचार करणं ही प्रगती असते. विचार न करणं हा विनाश असतो. विचार करण्याची पुढची पायरी क्रियाशीलता असते.
36) क्रीयेवाचून ज्ञान निरुपयोगी आणि संदर्भहीन असतं. ज्ञान आणि क्रियाशीलता संपन्नता आणतात.
37) जे अशक्य कोटीतलं समजण्यात आलं होतं ते प्रत्यक्षात उतरलं आहे. आणि जे सहज शक्य आहे असं समजलं गेलं आहे ते अजूनही घडलेलं नाही, पण घडेल नक्कीच.
38) बालकाचं नेत्यात रुपांतर करणं म्हणजे ‘तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता?’ याचं ‘मी तुमच्यासाठी काय करू?’ यात रुपांतर करणं. आणि या रुपांतराची प्रचंड जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर असते.
39) ‘आम्ही हे करू शकतो’ ही जिद्द विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणं हा शिक्षणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे.
40) श्रम आणि चिकाटी हे दोन सुंदर देवदूत आहेत. त्यांची आराधना करा. ते तुमच्या खांदयावर येऊन बसतील.
41) ‘प्रज्वलित मन’ ही पृथ्वीतलावरची, पृथ्वीच्या पोटातली आणि पृथ्वीच्या सुढूरवरची सगळ्यात शक्तिशाली साधनसामग्री आहे.
42) आई, वडील आणि शिक्षक हे परिवर्तन घडवून आणू शकणारे तीन महत्वाचे सामाजिक घटक आहेत.
43) बालपणीचं शिक्षण आणि नितीमुल्य ही महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणापेक्षा खूपच महत्वाची असतात.
44) एकविसावं शतक आपण निर्माण केलेल्या ज्ञानाच्या आणि माहितीच्या व्यवस्थापनचं आहे. आपण त्यात नितीमुल्यांचाही समावेश केला पाहिजे.
45) आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलो तरीही, आपलं लक्ष्य सामान्य माणसाची सेवाच असलं पाहिजे. सामन्यांचं कल्याण हाच सर्व मानवी ज्ञानाचा आणि प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.
46) एका मेणबत्तीनं दुसरी मेणबत्ती पेटवल्यास त्या मेणबत्तीचा काहीही तोटा होत नसतो.
47) स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा स्वतःसाठी जिंकण्यासाठी इतरांना मदत करणं ही आयुष्यातली जास्त महत्वाची गोष्ट आहे.
48) युवकांची मनं प्रज्वलित करणं हेच शिक्षकांचं जीवितकार्य असतं.
49) कित्येक दशकांपासून आपण जे करीत आलो आहेत, तसचं पुन्हा पुन्हा करीत राहणं हा काही पुढ जाण्याचा मार्ग नाहीय.
50) कोणताही देश त्या देशातील नागरीकांसारखाच असतो. नागरिकांचा लोकाचार, नितीमुल्ये आणि चारित्र्य त्या देशाच्या स्वरुपात परावर्तीत होत असतो.



संदर्भ- ए.पी.जे. अब्दुल कलाम (मराठी अनुवाद – चंद्रकांत नागेशराव पाटील) (२०१२). प्रेरणादायी सुविचार. साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात